दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी विजय केंकरे हुबेहूब पु ल देशपांडें सारखे दिसावेत यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली आहे.
भाई – व्यक्ती की वल्ली चित्रपटात पु ल देशपांडेंचा उतारवयातील लुक कसा तयार करण्यात आला
Mumbai - 02 Feb 2019 22:00 IST
Updated : 06 Feb 2019 1:15 IST
Suparna Thombare
पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये दिसणारी सर्व पात्रे त्याकाळातल्या नाटक आणि सिनेमा मधल्या त्यांच्या खऱ्या पात्रांसारखेच हुबेहूब दिसतील यासाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे.
देशपांडेंच्या म्हातारपणातील लुक तयार करणे, खासकरून त्यांची केसं हुबेहूब तयार करणे, खूपच कठीण होते.
सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी यांचा नॅच्युरल हेअर स्टुडिओने अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांसाठी विग्स तयार केले आहेत, त्यांच्यावर ही कठीण जबाबदारी सोपवण्यात आली होती.
नुकत्याच रिलीज झालेल्या ठाकरे चित्रपटासाठी नवाझुद्दीन सिद्दीकीच्या केसाची स्टाइल बाळासाहेबांसारखी करण्याची जबाबदारी देखील याच जोडगोळीवर होती.
विजय केंकरे, जे भाई – व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध या चित्रपटात वृद्धकाळातील पुलंची भूमिका करत आहेत, त्यांना फायनल लुक निश्चित करण्या अगोदर खूप ट्रायल्स साठी बसावं लागलं होतं. त्यांचा विग तिरुपतीच्या वेंकटेश्वरा मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या केसांपासून बनवला होता.
विजय केंकरेंचा लुक, खासकरून त्यांची हेअरस्टाइल, हुबेहूब पुलंसारखी दिसणे आवश्यक होते याबद्दल बोलताना जितेंद्र म्हणाले, "तरुणपणात पुलंसाठी विग बनवण्यापेक्षा वृद्ध पुलंचा विग बनवणे कैकपटीने कठीण होते.
"आम्ही त्यांच्या तरुण लुक साठी अगदी आठ दिवसात विग बनवला होता, पण वृद्ध पुलंच्या लुकसाठी विग बनवायला आम्हाला वीस दिवस लागले.
"साधारणतः म्हातारपणात केस विरळ होतात. तुम्ही जर त्यांच्या वृद्ध काळातील फोटो पहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल की त्यांचे केस कुरळे होते."
जितेंद्र पुढे म्हणाले की त्यांना केंकरेंचे कपाळ देखील मोठे दाखवणे गरजेचे होते. "पुलंचे कपाळ मोठे होते आणि त्यासाठी आम्हाला केंकरेंची कपाळावरची काही केस कापणे भाग होते. तिरुपती मधून आलेल्या एक एक केसापासून आम्ही हा विग तयार केला."
साळवी म्हणाले ठाकरे चित्रपटातसुद्धा नवाझुद्दीनचे कपाळ बाळासाहेबांसारखे दाखवणे खूप गरजेचे होते. "नवाझुद्दीन यांचे कपाळ v सारखे आहे तर ठाकरेंचे कपाळ मोठे आणि सरळ होते. त्यामुळे आम्हाला नवाझुद्दीन सिद्दीकीला बाल्डकॅप देऊन त्यावर केस चिकटवणे हाच पर्याय होता."
पहिल्या भागाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. भाई – व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला रिलीज होईल.
Related topics