अभिनेता माधव देवचक्के यांना मराठी बिग बॉसच्या नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या सीजनमुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली. हा शो जिंकण्यात अपयशी ठरले तरी शो मधून बाहेर येताच माधव देवचक्के यांना सुभाष घई यांचा विजेता हा चित्रपट मिळाला आहे.
चित्रपटाच्या मुहूर्ताला देवचक्केंसह चित्रपटातील इतर कलाकार सुबोध भावे, पूजा सावंत आणि सुशांत शेलार सुद्धा उपस्थित होते.
"बिग बॉस मधून बाहेर येताच मला सुभाष घई सारख्या महान फिल्ममेकरची निर्मिती असलेल्या चित्रपटात काम करायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. मी त्यांचे चित्रपट पाहत मोठा झालोय त्यामुळे त्यांच्याच मुक्ता आर्टस् या बॅनर खाली बनलेल्या चित्रपटात काम करायची संधी मिळणे हे माझ्यासाठी स्वप्नच आहे," असं देवचक्के म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "फिल्म सिटी मध्ये जिथे बिग बॉसचा सेट उभारला होता ती जागा माझ्यासाठी खूप लकी आहे कारण त्याच जागेवर माझ्या दोन सिरियल्स हमारी देवरानी आणि सरस्वती च्या सुद्धा सेट उभारल्या गेल्या होत्या. हमारी देवरानी, सरस्वती आणि बिग बॉस या तिन्ही शोज मुले माझ्या कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले."
सनई चौघडे (२००८) नंतर सुभाष घई यांची ही दुसरी मराठी निर्मिती आहे. सनई चौघडे मध्ये सुबोध भावे, श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.
अमोल शेटगे दिग्दर्शित विजेता हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे ज्यात कुस्ती, धावणे यासारखे खेळ आहेत.