News Hindi

मी सर्वांचेच प्रतिबिंब आहे – जॅकी श्रॉफ

त्यांनी आपले पुढील चित्रपट, टायगर श्रॉफ आणि त्यांनी रोमिओ अकबर वॉल्टर मध्ये एजेन्सी प्रमुखाची भूमिका निवडण्याचे कारण या सर्व गोष्टींवर चर्चा केली.

फोटो- शटरबग्स इमेज.

दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ २०१९ मध्ये खूप व्यस्त आहेत. भारत, साहो आणि प्रस्थानम आणि हल्लीच रिलीज झालेला रोमिओ अकबर वॉल्टर. गेल्या महिन्यात मीडियाला मुलाखत देण्यासाठी ते त्यांच्या पुण्याच्या केळ्याच्या बागेच्या शेतावरून डायरेक्ट जुहूला सन अन सॅण्ड या हॉटेल मध्ये आले होते. पाणी टंचाई, पाण्यामध्ये असलेले प्लास्टिकचे प्रमाण या सारख्या विषयांवर आपले मत व्यक्त केल्यानंतर त्यांनी चित्रपटाविषयी बोलायला सुरुवात केली.

श्रॉफ म्हणाले की रॉबी ग्रेवाल मुळे ते रोमिओ अकबर वॉल्टर मध्ये काम करण्यास तयार झाले. "माझे दिग्दर्शक आणि त्यांची भारताच्या गुप्तहेर खात्याची कथा सांगण्याची पॅशन या मुळेच मी हा चित्रपट करण्यास तयार झालो. बॉर्डर (१९९७) मध्ये विंग कमांडर बाजवा वर आधारित भूमिका केल्यानंतर प्रथमच मी कोण्या खऱ्या व्यक्तीवर आधारित भूमिका साकारत आहे."

या चित्रपटात ते रिसर्च अँड ऍनालिसिस विंग च्या प्रमुखाची भूमिका साकारत आहेत. १९६८ साली सुरु झालेल्या या एजन्सीचे रामेश्वर नाथ काव हे पहिले प्रमुख होते, आणि श्रॉफ यांची भूमिका त्यांच्यावरच आधारित आहे.

"मी फक्त स्क्रिप्ट मध्ये लिहले होते तेवढेच केले, त्यांनी जे बी पेरले होते त्याचे आता मोठे झाड झाले आहे," असे श्रॉफ म्हणाले.

ते म्हणाले की ते स्वतः कधीच फिल्ममेकर्स कडे जात नाहीत तर फिल्ममेकर्स त्यांच्याकडे चित्रपट घेऊन येतात. "मला वाटतं ते माझ्यात अनेक वेगवेगळी पात्रं पाहतात. ते मला साई बाबा म्हणून पाहतात तर मिशन काश्मीर मध्ये मला एक आतंकवादी म्हणून पाहतात. या चित्रपटासाठी मला एक गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून पाहिलं. असं दिग्दर्शक मला वेगवेगळ्या रूपात पाहतात. मी दिग्दर्शक कोण आहे, प्रोडक्शन हाऊस कोणतं आहे, आणि मला विचारण्यात आलेली भूमिका कशी आहे या सर्व गोष्टींचा विचार करतो," श्रॉफ म्हणाले.

 रोमिओ अकबर वॉल्टर (२०१९) चित्रपटामध्ये श्रॉफ

"भारतीय गुप्तहेर खात्याचे जनकाची भूमिका साकारणे हे माझे भाग्य आहे. आशा आहे मी या भूमिकेला न्याय दिला असेल. मला माझ्या दिग्दर्शकावर आणि इतर सर्व तंत्रज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. तरीही काही चुकी झाली असल्यास मी काव साहेबांच्या संपूर्ण कुटुंबाची माफी मागतो," असे श्रॉफ म्हणाले.

मी दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार अभिनय करणारा अभिनेता आहे, असे ते पुढे म्हणाले. "मी सर्वांचेच प्रतिबिंब आहे. मी कोणताही मुखवटा घालून जात नाही. त्यांनी माझ्या चेहऱ्यावर वेगवेगळे रंग लावावे आणि माझा मुखवटा तयार करावा. माझा चेहरा कोऱ्या कागदासारखा असतो त्यावर कोणते रंग भरायचे हे मी ठरवत नाही."

श्रॉफ म्हणाले की इंडस्ट्रीत चार दशक घालवल्या नंतर सुद्धा त्यांना सगळ्यांकडून तितकेच प्रेम भेटते. हिंदी चित्रपटसृष्टीतला त्यांचा प्रवास सुखमय होता.

सह-कलाकार मौनी रॉय आणि सिकंदर खेर यांच्याबरोबर.
फोटो - शटरबग्स इमेजस 

आपला मुलगा टायगर इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होताना पाहून ते खूप खुश आहेत. "सर्व देवाची कृपा," असं म्हणत त्यांनी टायगर बरोबर चित्रपटात काम करण्याची इच्छा दर्शवली.

वयाच्या ६३ वर्षी सुद्धा त्यांना काम करण्यासाठी काय प्रेरित करते विचारल्यावर ते म्हणाले, "आयुष्य, आयुष्य जगा! मी आताच एक सूर्यास्त पहिला, हा सूर्यास्त पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही. त्यामुळे मी तो क्षण जगलो. उद्या उठल्यावर पुन्हा हेच करणार."