News Marathi

सुबोध भावे आणि भरत जाधव विनोदी चित्रपटात एकत्र

अश्वनी धीर प्रथमच मराठी चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

भरत जाधव आणि सुबोध भावे अश्वनी धीर दिग्दर्शित चित्रपटात काम करणार आहेत अश्या बातम्या या वर्षाच्या सुरुवातीला येत होत्या. सुबोध भावे यांनी आता या बातमीवर शिक्कामोर्तब केली आहे. अश्रूंची झाली फुले नाटक आणि त्यातली लाल्या ची भूमिकेबद्दल आमच्याशी चर्चा करताना सुबोध भावे यांनी याचा खुलासा केला.

"होय, भरत जाधव आणि मी पुन्हा एकत्र काम करणार आहोत. हा मस्त धमाल चित्रपट आहे. चित्रपटाचे शीर्षक अजून नक्की झाले नसून प्रदर्शनाची तारीख सुद्धा निश्चित केली नाही," भावे म्हणाले.

गेल्या दोन वर्षात सुबोध भावेंनी अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. पण आता त्यात सुद्धा बदल झाला आहे. "मी या वर्षी कोणताच चित्रपट साइन केला नाही. ऑगस्ट महिन्यापासून मी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात करेन," भावे म्हणाले.

चित्रपटांबरोबरच ते प्रसिद्ध मालिका तुला पाहते रे मध्ये सुद्धा काम करत आहेत. इतक्या विविध प्रोजेक्ट्स मध्ये एकाच वेळी काम करणे तुम्हाला कसे जमते विचारल्यावर ते म्हणाले, "मी कधीच स्वतःला हा प्रश्न विचारला नाही. कदाचित स्वतःला हा प्रश्न विचारल्यावर मला इतकं काम करणं जमणार नाही. म्हणून मी स्वतःला हा प्रश्न कधीच विचारत नाही."

या चित्रपटा अगोदर भावे आणि जाधव यांनी उलाढाल (२००८) आणि लाडी गोडी (२०१०) चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

अश्वनी धीर प्रथमच मराठी चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. वन टू थ्री (२००८), अतिथी तुम कब जाओगे (२०१०), सन ऑफ सरदार (२०१२) आणि गेस्ट इन लंडन (२०१७) या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.