महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट – असा नट होणे नाही मध्ये प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतील असे एका पेक्षा एक सुंदर संवाद होते. काही संवाद वि वा शिरवाडकर यांच्या कादंबरीतून घेतले होते. कुणी घर देता का घर, हा चित्रपटातील सुप्रसिद्ध संवाद अजून लोकांच्या तोंडी आहे.
दिग्दर्शक सुरेश साहेबराव ठाणगे यांनी याच संवादात थोडा बदल करून आपल्या चित्रपटाचे शीर्षक तयार केले आहे. बायको देता का बायको असे चित्रपटाचे शीर्षक आहे.
चित्रपटाचा टीजर पाहता असे वाटते की फक्त कल्पक शीर्षक ठेवून भागत नाही तर तुमचा कन्टेन्ट देखील तितकाच चांगला असावा लागतो आणि नेमके तेच इथे झालेले नाही.
टीजरवरून चित्रपटाविषयी काहीच कल्पना येत नाही. काही पात्रं एकमेकांशी कोणाच्या तरी लग्नाविषयी बोलत आहेत. आईला सरकारी नोकरी वाला जावई हवा आहे परंतु मुलगी (श्वेता कुलकर्णी) हिला मात्र हे मान्य नाही. टीजरमध्ये एक ओवरऍक्टिंग करणारा दारुडा व्यक्ती सुद्धा दिसतो.
श्वेता कुलकर्णी बरोबर ठाणगे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. चित्रपटात सुनील गोडबोले आणि अभिलाषा पाटील यांच्यासारखे काही ज्येष्ठ कलाकार सुद्धा आहेत. खाली टीजर पहा.