News Marathi

डोंबिवली रिटर्न रिव्ह्यू – गर्दीच्या वेळी ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवासाची मजा, की सजा?

संदीप कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट डोंबिवली फास्ट ची आठवण करून देतो, पण आनंद नाही.

निशिकांत कामत यांचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न डोंबिवली फास्ट (२००५) मध्ये संदीप कुलकर्णी यांनी मध्यम वर्गीय माधव आपटेची भूमिका केली होती.

तो डोंबिवली मध्ये आपल्या बायको आणि मुलीसोबत राहत असतो.

दक्षिण मुंबईतल्या एका बँकेत अकाउंटंट ची नोकरी करणारा आपटे आपल्या जीवनात खुश नाही. तसेच त्याचा भ्रष्टाचाराला पूर्ण विरोध आहे. त्यासाठी तो संपूर्ण सिस्टिमला लढा द्यायला देखील तयार आहे.

या चित्रपटाचा प्रभाव मराठी प्रेक्षकांवर अजून सुद्धा आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी झाला होता. उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

या चित्रपटामुळे कामत हे नाव घराघरात पोचले आणि कुलकर्णी एका रात्रीत स्टार बनले.अजूनही ते माधव आपटे या नावाने ओळखले जातात.

आता २०१९ मध्ये महेंद्र तेरेदेसाईंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या डोंबिवली रिटर्न मध्ये कुलकर्णी पुन्हा एकदा डोंबिवली चे रहिवासी म्हणून आपल्या समोर आले आहेत. या वेळी ते अनंत वेलणकर हे व्यक्तिरेखा साकारत आहेत.

वेलणकर मंत्रालयातील जनसंपर्क कार्यालयात कारकून आहेत. डोंबिवलीत एका छोट्या फ्लॅटमध्ये पत्नी आणि आपल्या छोट्या मुलीसोबत राहतात.

नायका मध्ये आणि कथानका मध्ये अशा अनेक समानता असून सुद्धा निर्माते आपल्याला सांगत आहेत की या चित्रपटाचा डोंबिवली फास्ट शी काही संबंध नाही.

पण शीर्षकातले साम्य आणि कुलकर्णींची कॉमन मन ची भूमिका यामुळे २००५ ला रिलीज झालेल्या डोंबिवली फास्ट ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

नायकाचे काही निर्णय बिलकुल पटत नाहीत. वेलणकर, एक हुशार माणूस, दादासाहेब नावाच्या राजकारण्याचा अंधभक्त कसा असू शकतो? दादासाहेब जेव्हा एका विवादात अडकतात तेव्हा वेलणकर कोणताही विचार न करता त्यांना निर्दोष ठरवून टाकतो. त्यामुळे वेलणकर हा अराजकीय व्यक्ती आहे यावर आपला विश्वास बसत नाही.

जेव्हा वेलणकरला दादासाहेब खरोखरच खुनामध्ये सामील आहेत याचा पुरावा सापडतो तेव्हा वेलणकरचा त्यावरची प्रतिक्रिया अत्यंत पोरकट आहे. यानंतर चित्रपट एक वेगळेच वळण घेतो जे आपल्या बुद्धिमतेला न पटण्यासारखे आहे.

कुलकर्णी एका प्रामाणिक सामान्य माणसाच्या भूमिकेत शोभून दिसतात. पण तोच अभिनेता खूप वर्षांनी अगदी त्याच भूमिके मध्ये तेवढ्याच ताकदीचा अभिनय करेल याची खात्री नसते.

कुलकर्णींनी जरी आपली भूमिका उत्तम निभवायचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या अभिनयात आता तो स्पार्क नाही. अमोल पराशर, ज्यांनी संदीप कुलकर्णींच्या धाकट्या भावाची भूमिका केली आहे, त्यांचा अभिनय नैसर्गिक आहे.

डोंबविली रिटर्न हिंदीमध्ये शूट केला होता आणि त्यानंतर तो मराठीत डब केला, तरीही त्याचे मराठी व्हर्जन अगोदर रिलीज करण्यात आले आहे आणि हिंदी व्हर्जन १ मार्च ला रिलीज होईल.

डब केलेले संवाद ओठांच्या हालचालीशी मेळ खात नाहीत हे पाहून आपण खूप विचलित होतो, पुन्हा कधीकधी वेलंणकरच्या पत्नीचे हिंदी संवाद अगदी तसेच वापरले आहे. मराठी भाषिक दोन व्यक्ती अचानक हिंदी का बोलायला लागतील हे समजण्यापलीकडे आहे.

जेव्हा तुम्ही या छोट्या मोठ्या चुकांबद्दल विचार करत असता तेव्हा अचानक चित्रपटात शेवटी एक खूप मोठा ट्विस्ट येतो. पण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसण्याऐवजी तुम्ही चित्रपटात आतापर्यंत जे काही दाखवले त्याचा नेमका अर्थ काय होता याचा विचार करत राहता. डोंबिवली रिटर्न हा अर्ध्या तासाचा लघुपट म्हणून अधिक प्रभावशाली झाला असता.

शेवटी डोंबिवली रिटर्न च्या निर्मात्यांना फक्त डोंबिवली फास्ट चे कथानक आणि पात्रांच्या लोकप्रियतेचा फायदा उचलायचा होता असा विचार तुमच्या डोक्यात आल्या शिवाय राहत नाही. ऐन गर्दीच्या वेळी सीएसटी ते डोंबिवली प्रवास करताना प्रवाश्याला जो अनुभव येतो तोच अनुभव हा चित्रपट पाहताना येतो.