शिवसेना अध्यक्ष बाळ ठाकरे यांचा जीवनपट २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. त्याच दिवशी कंगना रानौतचा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि इम्रान हाश्मीचा चीट इंडिया हे चित्रपट रिलीज होणार आहेत.
शिवसेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष बाळा लोकरे यांनी ठाकरे चित्रपटाच्या रिलीज दिवशी इतर कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.
त्यांच्या फेसबुक पेज वर त्यांनी हे विधान केले. "२५ तारखेला ठाकरे चित्रपट रिलीज होणार आहे. त्या दिवशी इतर कोणता चित्रपट रिलीज केला तर आम्ही तो चालू देणार नाही."
शिवसेनेने या अगोदरही ह्याप्रमाणे काही चित्रपटांना रिलीज होऊ दिले नाही. शिवसेनेच्या विरोधामुळेच १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानची क्रिकेट टीम मुंबईमध्ये एकपण क्रिकेट मॅच खेळू शकली नाही.
अभिजित पानसे चे दिग्दर्शन असलेल्या ठाकरे चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी ठाकरेंची प्रमुख भूमिका करत आहेत. हिंदी आणि मराठी अश्या दोन भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. दोन भाषांसाठी दोन वेगळे ट्रेलर्स काल मुंबईत एका मल्टिप्लेक्स मध्ये रिलीज करण्यात आले.
ट्रेलरमधून बाळासाहेबांची दक्षिण भारतीयांविरोधी असलेली भूमिका स्पष्ट दाखवली आहे. बाबरी मस्जिद आणि १९९३ बॉम्बस्फोट ह्याबद्दल त्यांचं काय मत आहे हेदेखील ट्रेलरमधून स्पष्टच दाखवलं आहे.
सी बी एफ सी (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ह्यांनी ठाकरे चित्रपटातून तीन सीन्स कट करण्याची मागणी केली आहे परंतु चित्रपटाचे निर्माते-लेखक संजय राऊत यांनी याला साफ नकार दिला आहे.
ट्रेलर रिलीज होऊन अजून २४ तास पण नाही झालेत आणि सर्व चुकीच्या कारणासाठी चित्रपट चर्चेत राहिला आहे.