अंगमली डायरीज ह्या मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक कोल्हापूर डायरीज यातून महेश शेट्टीचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण.
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता महेश शेट्टी अंगमली डायरीजच्या मराठी रिमेक मध्ये खलनायकच्या भूमिकेत
Mumbai - 18 Dec 2018 1:55 IST
Updated : 17 Jan 2019 0:21 IST
Our Correspondent
अंगमली डायरीज ह्या सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा मराठीमध्ये रिमेक बनत आहे ही बातमी नवीन नाही. परंतु आता ह्या चित्रपटाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे ती म्हणजे टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेता महेश शेट्टी यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जो राजन यांचा दिग्दर्शनात हा पहिलाच प्रयत्न आहे.
महेश शेट्टी यांनी काही हिंदी मालिकांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. बालाजी टेलिफिल्म्सची बडे अच्छे लगते हैं या मालिकेमध्ये साकारलेल्या सिद्धांत या खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना अनेक टेलिव्हिजन पुरस्कार मिळाले होते.
कोल्हापूर डायरीज या चित्रपटात त्यांच्या पात्राचं नाव अण्णा असेल. हा शेट्टींचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी रवी जाधवने दिग्दर्शित केलेल्या आणि रितेश देशमुख, नर्गिस फाकरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या बेंजो (२०१६) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
भूषण पाटील यांची ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या अगोदर त्यांनी ओळख: माय आयडेंटिटी (२०१५) व बर्नी (२०१६) या चित्रपटात काम केले होते.
लिजो जोस पेलिशेरी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या अंगमली डायरीज मध्ये अँटनी वर्गीस प्रमुख भूमिकेत होते. अंगमली शहरावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो काय काय करतो हे या चित्रपटाचं कथानक आहे.
११ मिनिटाच्या १ टेक शॉट साठी या चित्रपटाची खूपच प्रशंसा झाली होती. या चित्रपटात जवळजवळ ८६ नवखे कलाकार होते.
अवधूत गुप्ते ज्यांनी बॉईज (२०१७) आणि बॉईज २ (२०१८) हे हिट चित्रपट प्रस्तुत केले होते, आता तेच हा चित्रपटदेखील प्रस्तुत करणार आहेत.
Related topics